साठ लाख विद्यार्थ्यांचे टीचर ~ विवेक सावंत

साठ लाख विद्यार्थ्यांचे टीचर ~ विवेक सावंत

मंगेश कोळपकर
Saturday, August 06, 2011 AT 12:00 AM (IST)
Article link “Saptahik Sakal”  :

राज्यातल्या साठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणाऱ्या “एमकेसीएल’ या संस्थेचा विस्तार आता राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांसोबतच देशाबाहेरही होतो आहे. आधुनिक काळात शिक्षणाच्या बदलत्या समिकरणांचा वेध घेऊन त्यानुसार शिक्षण देणारे विवेक सावंत हेच “एमकेसीएल’च्या यशाचे खरे सूत्रधार म्हणावे लागतील. 

देशात आयटी क्षेत्राची बूम वाढली, तसे प्रत्येकच क्षेत्रात कॉम्युटरने पदार्पण केले. कुठल्याही क्षेत्रात जायचे, तर कॉम्युटरचे किमान ज्ञान असणे गरजेचे झाले. ही गरज ओळखून एमएस-सीआयटी हा अभ्यासक्रम सुरू झाला. राज्यात अनेक ठिकाणी एमएस-सीआयटी केंद्र सुरू झाली. लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकाला हा अभ्यासक्रम शिकण्याची गरज वाटू लागली. संगणक प्रशिक्षणाचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्याचा हा उपक्रम चालविणारी संस्था म्हणजे एमकेसीएल, अर्थात महाराष्ट्र ज्ञान महामंडळ. दहा वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे आणि त्याला फुलविण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला, तो विवेक सावंत यांनी. 

या कालावधीत तब्बल साठ लाख लोकांनी एमएस-सीआयटीच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण घेतले. राज्यात साडेसहा हजारांहून अधिक केंद्रे असलेल्या (ऑथोराईज लर्निंग सेंटर्स – एएलसी) या संस्थेची 225 कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल आहे. एक निमसरकारी संस्था असूनही तिचा लौकिक देशभर झाला आहे. राम ताकवले यांच्यासारख्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञाने समाजाची नाडी ओळखून ही संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. या संस्थेची गरज ओळखून शरद पवार, दिलीप वळसे पाटील या कल्पक राजकीय नेतृत्वाने तिची अंमलबजावणी केली. 

अनेक अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेपासून संगणक व्यवसाय प्रशिक्षणाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम यशस्वी झाले आहेत. डिजिटल सिटीझन, डिजिटल सहेली, वर्ल्ड क्‍लास ऍकॅडमी फॉर व्होकेशनल एक्‍सलन्स, ई-लर्निंग, डिजिटल युनिर्व्हसिटी, टॅलेंट सर्च प्रोग्रॅम ही त्याची काही उदाहरणे. शिक्षणाचा प्रसार करतानाचा व्रत समजून सामाजिक कार्यात झोकून दिलेल्या कुटुंबातून विवेक सावंत यांची जडणघडण झाली. त्यामुळे साधेपणा, शिस्त, ध्येयाप्रत चिकाटी हे गुण त्याच्यात उपजतच होते. आधुनिकतेची कास धरून मार्गक्रमण करताना वैचारिक स्पष्टता कायम ठेवत कार्यावर निष्ठा ठेवल्यामुळेच लहान-लहान गावांतून उद्योजक, विद्यार्थी घडविण्यात सावंत यांची “टिम-एमकेसीएल’ यशस्वी झाली आहे. 

समर्थ महाराष्ट्र घडविण्याचा ध्यास असलेल्या सावंतांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव आहेच; पण आपण योग्य मार्गावर आहोत याचा त्यांना अभिमानही आहे. या कामात त्यांना दिवसाचे 24 तासही कमी पडतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे स्वतःच्या केबिनमध्ये बसून सावंत यांचा जगभर संचार सुरू असतो. 

यशाची वाटचाल

कोकणातील पाळेमुळे असणाऱ्या विवेक सावंत यांचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये झाले. सावंत यांनी पुणे विद्यापीठात 1977 मध्ये फिजिक्‍समध्ये एमएस्सी केले. 1979 ते 88 दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतानाच लोकविज्ञान चळवळीत ते सहभागी झाले. समाजाच्या नेमक्‍या वास्तवाची जाणीव त्यांना याच काळात झाली. वैचारिक बैठकीला अनुभवाची साथ मिळाल्यामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या. त्याचेच प्रत्यंतर त्यांनी दरम्यानच्या काळात लिहिलेल्या प्रासंगिक लेखनातून दिसून येते. क्षयरोगाचा विषाणू शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी शोधला होता. त्या घटनेला शंभर वर्षे झाल्याच्या निमित्ताने लिहिलेला “मारणारे मेले, मी जिवंत आहे,’ हा लेख किंवा बुवाबाजीवरचा “मुलाला आलेली शेपटी आणि नव्या बुवाचा उदय’, “शेतमजुरांचे किमान वेतन शास्त्रीय पायावर ठरवावे’ या संदर्भातील त्यांचे लेख अभ्यासपूर्ण वाटतात. पर्यावरण हाही त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. केरळमधील सायलेंट व्हॅली असो वा पुणे विद्यापीठाच्या आवारातील झाडे पाडण्याच्या मोहिमेला केलेला विरोध असो, सावंत यांच्या लेखनात साहित्यिक संस्कार आढळतात. 

प्राध्यापकी सुरू असतानाच काही तरी वेगळे करण्याचा असलेला ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. 1987-88 मध्ये त्यांनी सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजीमध्ये पहिले उपसंचालक म्हणून काम केले. त्याचदरम्यान “सी-डॅक’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सावंत 1988 ला “सी-डॅक’मध्ये रुजू झाले. त्यानंतर तीन वर्षांत “सी-डॅक’ने पहिला सुपर कॉम्प्युटर तयार केला. त्या टिममध्ये सावंतही होतेच. एक संगणक झाला; परंतु भविष्यातही असे संगणक तयार करण्यासाठी तंत्रज्ञ घडवावे लागतील. याची जबाबदारी डॉ. भटकर सावंतांवर टाकली. त्यातूनच “ऍडव्हान्स कॉम्प्युटर ट्रेनिंग स्कूल’ तयार झाले. प्रगत संगणकाचे प्रशिक्षण देणारी ही भारतातील पहिली संस्था होती. त्यातून सावंतांचे 25 हजार विद्यार्थी घडले. “सी-डॅक’मध्ये असताना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतही विवेक सावंत यांनी काम केले. विधानभवनाचे संगणकीकरण करतानाच सभागृहातील भाषण अवघ्या काही क्षणांत कुठल्याही भाषेत प्रक्षेपित करण्याची यंत्रणा उभारण्यात सावंत यांचा मोलाचा वाटा होता. मुद्रांक शुल्क खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेही संगणकीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. मे 2000 मध्ये “सी-डॅक’मधून बाहेर पडल्यावर “माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्चशिक्षण देणाऱ्या “आयस्व्केअरआयटी’ या फिनोलेक्‍स ग्रुपच्या संस्थेचे पहिले संचालक म्हणून ऑगस्ट 2002 पर्यंत सावंतांनी काम केले. 

“एमकेसीएल’ची मुहूर्तमेढ 

दरम्यान 1999 मध्ये शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. पदवीनंतर शिक्षण न संपता, निरंतर सुरू राहावे, यासाठी काय करता येईल, असे उद्दिष्ट समितीच्या डोळ्यांसमोर होते. त्या समितीत विवेक सावंत आणि इतर तिघे जण होते. संगणक साक्षरतेची कास धरून शिक्षणाचे सार्वत्रीकरण करण्यासाठी “एमकेसीएल’ची स्थापना करण्याबाबतचा अहवाल समितीने सादर केला. त्यानंतर दीड एक वर्षांनी “एमकेसीएल’ची स्थापना करायची व त्याची जबाबदारी सावंत यांना द्यायची निश्‍चित झाली. ऑगस्ट 2001 मध्ये संस्थेची कंपनी म्हणून मुंबईत नोंदणी झाली अन्‌ पुण्यातून कामाला सुरवात झाली. सरकारी केटरिंग कॉलेजच्या एका रिकाम्या खोलीतून काम सुरू झाले. 
“पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’हे रोल मॉडेल तयार करताना नव्या शिक्षणपद्धतीचे राज्यव्यापी प्रात्यक्षिक द्यायचे, दुसरीकडे ही संस्था आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करायची आणि आयटी साक्षरतेचा प्रसार करून निरंतर शिक्षणाचा सुलभ, स्वस्त, परिणामकारक व परिवर्तनशील महामार्ग तयार करायचा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्या नुसारच “एमएस-सीआयटी’ (महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी) या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली. “एमकेसीएल’ने लहान-मोठ्या संगणक प्रशिक्षण संस्थांना हा अभ्यासक्रम शिकविण्याचे हक्क दिले. वाजवी शुल्क आणि मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलगू, गुजराती, उडिया व फ्रेंच भाषांतून शिकविण्याची सुविधा असल्यामुळे हा अभ्यासक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. आता तर तो उर्दू माध्यमातूनही शिकविण्यात येणार आहे. अभ्यासक्रम शिकविताना विद्यार्थ्यांशी वर्तन कसे असावे, याचेही मापदंड सावंत यांनी घालून दिले असून त्यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्या धर्तीवर ई-लर्निंग माध्यमातूनही अनेक अभ्यासक्रम आता रूढ झाले आहेत. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी “वेव्ह’ हा उपक्रमही यशस्वी झाला आहे. संस्थेतील अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांची, उमेदवाराची गुणवत्ता वाढली पाहिजे, असा सावंतांचा कटाक्ष असतो. 

राज्याबाहेरही विस्तार 

“एमकेसीएल’चा विस्तार आता राज्याबाहेरही होतो आहे. राजस्थान सरकारने 2008 मध्ये राजस्थान नॉलेज कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे. मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, उत्तरप्रदेशातही चर्चा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे. सौदी अरेबियामध्ये ऑक्‍टोबर 2007 मध्ये संस्थेच्या कामकाजाला सुरवात झाली. राजधानी रियाधमध्ये सुमारे साडेआठ हजार विद्यार्थी असून त्यात 1400 महिला आहेत. आफ्रिकेतील घानामध्येही संस्थेचे कामकाज सुरू झाले आहे. अल्पावधीतच आखाती व आफ्रिकन देशांमध्ये संस्थांचे कार्यक्षेत्र असेल, असे सावंत आत्मविश्‍वासाने सांगतात. 

“”विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात पारंपरिक शिक्षणाबरोबरच इतर कौशल्येही आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण यांची सांगड घालणे गरजेचे आहे. कामातून ज्ञानप्राप्ती व ज्ञान प्राप्तीतून अधिक फलदायी काम करण्याची करायला हवे” असे सावंत यांचे मत आहे. 

पाच तरी नोबेल शास्त्रज्ञ हवे 

महाराष्ट्रातून किमान पाच नोबेल शास्त्र घडविण्याचे सावंत यांचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रज्ञा संवर्धन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विज्ञान ऑलिंपियाडच्या माध्यमातून ते घडवीत आहेत. त्याचीच परिणती म्हणून संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी निवड झाली आहे. शालेय स्तरापासूनच त्यांच्या विकासाचे उद्दिष्ट बाळगले, तर संशोधनासारख्या क्षेत्रातून पाच विद्यार्थ्यांचा प्रवेश नोबेल पारितोषिकापर्यंत होऊ शकतो, असे सावंत यांना वाटते. 

देशातील प्रत्येक जिल्ह्यात “एमकेसीएल’पोचविण्याचा ध्यास सावंत यांनी बाळगला आहे. तंत्रज्ञानाचे सार्वत्रीकरण होत असल्याचा फायदा तळागाळातील जनतेलाही होत आहे. या वर्गातून आधुनिकतेची कास धरली, तर समाजाचाही विकास होईल व बलशाली भारताचे स्वप्न साकार होईल. हेच ध्येय बाळगून त्यादिशेने जाणाऱ्या प्रवाहात “एमकेसीएल’ही आहे. 

विवेक सावंत यांची उद्दिष्टे 

1- वाढत्या विद्यार्थी संख्येला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करायच्या 
2- गुणवत्ता उत्तम ठेवायची 
3- शिक्षण शुल्क शक्‍य तितके कमी ठेवायचे 
4- शिक्षण सर्वत्र म्हणजे कोनाकोपऱ्यातही उपलब्ध व्हायला हवे 
5- कमीत कमी कालावधीत शिक्षण उपलब्ध करायला हवे 
6- सामुदायिक तरीही व्यक्तिनिहाय शिक्षण पद्धती हवी 

2020 मधील भारत 

मनुष्यबळ विकास खात्याच्या अंदाजानुसार, 2020 मध्ये अमेरिकेत पावणे दोन कोटी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असेल. युरोप व जपानमध्येही तुटवडा असेल. चीनमध्येही एक कोटी जागा रिकाम्या असतील; कारण त्यांचा लोकसंख्यावाढीचा दर आपल्यापेक्षा कमी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची गरज भागविण्यासाठी सर्व देश आपल्याकडे वळू शकतील; कारण त्या वेळी भारतात अकरा कोटींची “वर्किंग एज पॉप्युलेशन’ असेल. त्यावेळी अतिरिक्त मनुष्यबळ असणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल. 

काय आहे “एमकेसीएल’? 

“एमकेसीएल’ ही सामाजिक कार्य करणारी संस्था नसली, तरी संस्थेने छोट्या-छोट्या गावांमधून अनेक उद्योजक घडविले आहेत. गेल्या दहा वर्षांत संस्थेचे पारदर्शी व्यवहार राहिलेत. एमकेसीएलचे स्वतःचे कर्मचारी जेमतेम दीडशे आहेत. पण, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्‍यात पसरलेल्या या कोर्स सेंटर्सच्या नेटवर्कमुळे जवळपास एक लाख तरुणांना रोजगार मिळाला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातही तीस लर्निंग सेंटर्स आहेत. मुख्य म्हणजे या सर्व तरुणांना मिळालेला रोजगार हा स्थानिक पातळीवरचा आहे. एरवी रोजगारासाठी शहरात धाव घेणाऱ्या या तरुणांचा गावातच विकास होत आहे. 

Scanned Images of the Feature:

Article link: http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20110806/5396804993686665839.htm

%d bloggers like this: